Red ramblings

Red ramblings are about my experiences in Shanghai life. My observations - colored by my viewpoint :-)

Thursday, September 10, 2026

पाणीदार मठ्ठा

अशात एका मित्राला मी पूर्वी लिहिलेलं काही हवं होतं. त्याच्याकडून ते डिलीट झालं होतं. ते शोधायला मलाही जरा वेळ लागला. पण शोधता शोधता जुनं लिहिलेलं परत बघावं लागलं. आपलेच जुने फोटो बघायला कधी छान वाटतं तसं मीही मीच पूर्वी लिहून ठेवलेलं वाचण्यात गुंग झालो. 

वाचतांना दोनतीन गोष्टी लक्षात आल्या. पहिली म्हणजे माझी लिहिण्याची एक शैली आहे - सध्याच्या मराठीत ज्याला स्टाईल म्हणतात ती. मला फार गंभीर लिहिता येत नाही! लिखाण फार गंभीर व्हायला लागलं की माझ्या लिखाणात काही फालतूपणा असतो. विनोद असतो (बऱ्याच वेळा तो विनोदाचा केप्र (केविलवाणा प्रयत्न!) असतो, हा भाग वेगळा). या नादात काही गंभीर, क्वचित महत्वाचा मुद्दा माझ्या लिखाणात उठून दिसता‌ दिसता निसटून जातो का काय अशी शंका मनात यावी इतपत.  


दुसरं असं, की मी लिहितो त्यात मुद्दा कमी आणि फापटपसारा जास्त असंही असतं. एखाद्या AI program ला माझा लेख देऊन 'यातले मुख्य मुद्दे सांग' असं विचारलं तर तो program याचं उत्तर नक्की काय द्यायचं यासाठी बुचकळ्यात पडण्याची शंका जास्त आहे. माझ्या लिखाणात बरेचदा माझे अनुभव डोकावतात. माझ्या आजूबाजूची मंडळी (बऱ्याच वेळा बायको) असतात. म्हणजे माझे सगळे अनुभव जर लिहून झाले तर‌ नवीन काही लिहायला माझ्याकडे काही उरणार नाही! 'कल्पना' - एखाद्या न घडलेल्या गोष्टीची गोष्ट - हे माझ्या लिखाणात फार कमी वेळा दिसतं. तिरकस लिहिण्यात माझी प्रतिभा जास्त रमते. कल्पनाविलास तिला फार आवडत नाही. कदाचित यामुळेच मी लेख जास्त लिहितो, कथा कमी - जवळजवळ नाहीच - लिहितो. आयुष्याबद्दल काही फार गहन, गंभीर, एखादं परम सत्य असाही विचार मी मांडत नाही. माझं आयुष्य चाकोरीबद्ध आहे. त्यात फार नाट्यमय प्रसंगाची रेलचेल नाही - मग माझ्या लिखाणात तरी ती कुठून येणार? 

 

हे का जाणवलं? तर एकदा विमानतळावर कुणाला तरी आणायला गेलो असताना तिथे दोनेक तास वाट पहात होतो. तेव्हा तिथे असलेल्या एका मेडिकल बूथवरच्या दोन मुलींबद्दल (त्यांना काहीच काम नसल्याबद्दल) मी एक लेख लिहिला होता - फार मोठा नाही - चारपाच परिच्छेद असतील. मित्रांच्या ग्रुपवर पाठवला. नेहेमीप्रमाणे 'शांततेने' त्याचं स्वागत (असं मी म्हणतो. मित्रांनी बहुधा दुर्लक्ष केलं!) झालं, पण एकाने लिहिले - 'लेख छान आहे. एकतर शुद्ध मराठीत आहे आणि जिथे मुळात काही विषयच नाही तिथे तू पन्नास ओळी खरडल्या आहेस! त्यासाठी तुझं कौतुक!' 


त्यावेळी काही वाटलं नाही पण आज परत एकदा माझेच लेख वाचताना ती कॉमेंट आठवली. मग प्रत्येक लेख वाचताना, या लेखात मला काय सांगायचंय - याचा विचार करायला लागलो. फार काही त्यात नसतं, हे जाणवून गेलं. आणि प्रकर्षाने जाणवलं असावं कारण यावेळी ते खुपलंच. 


हे असं आहे तर मग मी का लिहितो? माऊली म्हणून गेल्यात - 'राजहंसाचे चालणे,  जगी जालिया शहाणे, म्हणोन काय कवणे, चालाविचे ना!' या धर्तीवर मला वाटतं म्हणून मी लिहितो हे एक. शब्दसृष्टिचा मी ईश्वर तर नक्कीच नाही - पण त्या सृष्टीत मी एखादा कारकून, गेला बाजार चपराशी तरी असणार. त्यामुळे मी लिहितो! मला लिहावं लागतं! 


दुसरं असं, की 'चला, आता आज शंभर ओळी लिहायच्या आहेत' असं‌ म्हणत मी कधीच लिहू शकत नाही. कधीतरी अचानक डोक्यात चक्र फिरायला लागतात. लिहिल्या शिवाय चैन पडत नाही - मग एकामागोमाग एक शब्द टाईप होत जातात. लेख तयार होत जातो. सांगण्यासारखं फार काही नसतंच, पण शब्दांचा कापूस पिंजला जातो. वजन वाढत नाही, पण बरंच काही मोठं आहे असा मात्र आभास मी देत राहतो. 


बरं, एकदा लिहिलेलं परत तेच लिहिता येत नाही. डोक्यात असलेली शब्दरचना डोक्यातून बाहेर पडून कागदावर (स्क्रीनवर!) उमटली, की ती बाहेरच पडली. परत तशीच जमणं महामुश्कील. सटवाईला जसं नवजात शिशूच्या कपाळावर आपण भविष्य काय लिहिणार आहे हे लेखणी कपाळावर टेकवेपर्यंत माहीत नसतं, तसंच माझ्या मनातला विचार काय शब्दरचना घेऊन बाहेर पडणार आहे, याचं मलाही कुतूहल असतं! 


तिसरं observation असं की मी दोन तीन पानी लेख लिहितो. ही सुद्धा एक मर्यादा आहे. कदाचित ते वर लिहिलेल्या पहिल्या मुद्द्याशी निगडित आहे. कथाबीज छोटं असल्याने त्यात किती पाणी घालून वाढवणार? लिखाण आहे, मठ्ठा नाही! पण सध्याच्या low attention spanच्या जमान्यात माझे थोडेफार वाचक टिकून राहायला त्याची मदत होत असावी! 


डोक्यात वाफ दाटली की लिहायचं हे माझं प्राक्तन असावं. कुणी वाचक असो नसो, मी स्वतः एक हक्काचा वाचक माझ्या लिखाणासाठी नक्कीच आहे. तो वाचक चोखंदळ आहे. तोही माझ्या शैलीच्या प्रेमात आहे, आयुष्यासाठी काही गहन, गंभीर विचार आहे का या बाबतीत तो फार पर्टिक्युलर नाही. काही छान, मिस्किल वाचायला मिळतंय ना - एवढंच तो बघतोय. जोपर्यंत तो वाचतोय, तोपर्यंत लिहायला मला प्रॉब्लेम नाही! 


अभिजित टोणगांवकर / सप्टेंबर - २०२६

आठवणींमागची माणसं

माझ्या बायकोची ढोबळी मिरचीच्या भाजीची एक रेसिपी आहे. काही खास प्रसंगी ती त्या पद्धतीने ती भाजी करते. आणि बहुधा खाणाऱ्यांपैकी कुणीतरी तारीफ करतंच - मग त्या रेसिपीची कथा सांगितली जाते. बंगलोरला राहायला गेल्यावर - काहीतरी लांबचीओळख निघाली आणि मुळच्या धारवाडच्या, पण नोकरी निमित्ताने बंगलोरला स्थायिक असलेल्या एका 'अंकल-आंटीं'नी आम्हाला 'दत्तक' घेतलं होतं. त्यांचं मराठी खास धारवाडी होतं. खरंतर त्यांची स्वतःची मुलं आमच्यापेक्षा दोन पाच वर्षांनी लहान होती. पण त्यांच्या आमच्या तारा जुळल्या हे खरं. 


तर मीनलला त्यांनी ती पद्धत शिकवली. तिलाही ती छानच जमली - आणि मग तिने ती स्वतःच्या पोतडीत जमाच केली. आता ही गोष्ट सुद्धा तिसेक वर्ष जुनी. मला छान असं वाटतं की ती भाजी झाली की आंटींची आठवण निघते. त्या कुटुंबाच्या आमच्यावरच्या मायेची गोष्ट निघते. मग नंतर निवांत वेळ मिळाला की बायको आणि मी अंकल-आंटींची आठवण काढतो. 'फोन करायला हवा बरका' असंही म्हणतो. क्वचित कधी फोन होतोही. आठवण जागी राहते. 


अशीच एक नेहमी निघणारी आठवण माझ्या मावशीची. कधीतरी तिच्याकडे जेवायला गेलो असताना खाल्लेली दाणे जिऱ्याची कोरडी चटणी. फारच आवडली म्हणून 'कशी केलीस?' असं विचारून आजही त्या पद्धतीने ती चटणी घरी होते - आणि हमखास मावशीची आठवण निघते. परवा तिला भेटलो, तेव्हा तिला हे सांगितलं. तर खास तिच्या स्टाईलमध्ये हसत म्हणाली, 'अरे, किती साधी चटणी असते ती! आणि तुला कधी सांगितली? मला तर बाई नाही आठवत!' गोष्ट त्या चटणीची नाहीच आहे, गोष्ट आठवणींची आहे. 


पदार्थांचं आपलं नाव. त्या निमित्ताने काही खास व्यक्तींच्या आठवणी निघतात - छान गप्पा होतात (चयकोबाचा चडमु चकठी असेल तर 'ही काय चहा प्यायची वेळ आहे का?' हा प्रश्न न येता चहा होतो!). 


सगळ्याच अश्या आठवणी स्वयंपाकघरातील नसतात. आता दहा वर्षे झाली, मुलगी शिकण्याच्या, मग नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडली. मधे आली होती. सकाळी चहा घेत गप्पा मारत होतो तेव्हा दुध आलं. प्लॅस्टिकच्या पिशवीत. वरती गाठ. मी नेहेमीप्रमाणे कात्रीने गाठ कापणार तो, तिने मला थांबवत, कात्री न वापरता गाठ कशी सोडायची ते दाखवलं! ती आली होती चारच दिवसांसाठी. पण आता दररोज दुधाच्या पिशवीची गाठ सोडताना, 'आपल्याला हे मुलीने शिकवलं' हे डोक्यात येऊन जातं - रोज बोललो नाही तरी तिचा विचार येऊन जातो! 


बंगलोरला आलो तेव्हा घरची एक प्रथा म्हणून श्रावणात सत्यनारायण पूजा आम्ही करायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने घरात एक चांगला कार्यक्रम आणि मित्रांना घरी बोलवायला कारण - असा दुहेरी हेतू त्यात होता. पहिल्या वर्षी आई-वडील तिथे होते, तेव्हा बाबांनी पूजा सांगितली. 'आता दरवर्षी श्रावणात पूजा करत जा. पण प्रत्येक श्रावणात मी असेनच असं कसं होईल? तेव्हा ही पूजा कशी करायची ते सांगतो' असं म्हणून त्यांनी मला एक पद्धत लिहून दिली. महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी लिहिलेलं 'नित्य पूजा' या शीर्षकाचं एक पुस्तक बाबांनी मला दिलं. त्यातून षोडशोपचार पूजा कशी करायची या संदर्भातील प्रकरणे आणि योग्य ते उपविभाग यांचे नंबर लिहून दिले. आणि ते करत असताना त्यांच्याच काही लक्षात आलं - 'अरे इथे हे एक बदललंस की गणेश पूजन होईल, आणि हे असे बदल कर - लक्ष्मी पूजनाची पूजा होईल!' 


तसे माझे बाबा अगदी धार्मिक नसले तरी रोजची पूजा त्यांची साग्रसंगीत असे. घरातल्या मोठ्या पूजा - सत्यनारायण, गौरी-गणपती‌ - यासाठी कायमच घरी कोणी गुरुजी येत असत. त्या पार्श्वभूमीवर या परक्या प्रदेशात - याला आपल्या पद्धतीने पूजा सांगणारे गुरुजी कसे मिळणार? तेव्हा स्वतःच्या भूमिकेशी मुरड पण व्यावहारिकतेची सांगड घालत त्यांनी मला योग्य मार्ग दाखवला होता. मी स्वतः ही पद्धत दोन पाच जणांना सांगून त्यांना मदत केली आहे. 


घरातले सगळे व्यवहार आम्हा मुलांच्या हातात सोपवल्यानंतर असेच परत बंगलोरला आले होते, तेव्हा हा विषय निघाला. मी, त्यांनी, त्यांचा (आम्हाला वाटलेला) हा कर्मठपणा बाजूला ठेवल्याबद्दल आश्चर्य, कौतुक व्यक्त केलं.  'अरे, एकतर आपण पुण्यात करतो तशी पूजा इथे शक्य नाही. मग तू फक्त हळदकुंकू वाहून पूजा करणार त्याऐवजी षोडशोपचार पूजा तुला जमेल तशी करशील हा विचार मी केला! थोडा स्वार्थीच म्हण!' वडील हे रसायन एकाच वेळी पुर्णपणे समजत नाही हेच खरं. आज प्रत्येक वेळी या पद्धतीने पूजा करतो, तेव्हा बाबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे किती छान आहे! 


'मला सगळं कळतं, मला कुणी काही शिकवू नका...' असं म्हणणं शक्य आहे, पण मग या अशा आठवणी कशा तयार होणार? आणि जगणं म्हणजे 'आला दिवस ढकलला' एवढंच थोडंच असतं? आयुष्य रंगीत करायला आठवणी हव्यातच. भरपूर अनुभव घ्यावेत, गडबड करावी, गोंधळ घालावेत, आयुष्य आठवणींनी उपभोगावे. आणि त्यांच्याबरोबर आठवणींच्या मागची माणसं पण आठवावीत. त्याच्याशिवाय काय मजा? 


अभिजित टोणगांवकर/ सप्टेंबर - २०२६