दोन स्तोत्रे - एक
विचार...
माझं 'करून करून भागला, आणि
देवपूजेला लागला' असं काही होतंय का
काय असं वाटतंय! सकाळी फिरायला जाण्याची सवय जुनी आहे. गेले काही दिवस सकाळी कानात
इअरबड अडकवून आवडलेली काही स्तोत्रे ऐकतो आहे! परिक्रमेत असताना सकाळ-संध्याकाळ
मैयापूजा करत होतो - आता कमितकमी ती स्तोत्रे दिवसातून एकदा तरी ऐकावीत असं म्हणत सुरवात
झाली आणि मग त्यात भर पडत गेली, तासाभराची
playlist आहे! त्या ऐकण्यातून
जाणवलेलं हे काही.
श्रीमद्भगवद्गीतेच्या १८व्या अध्यायातील श्लोक
५५ असा आहे:
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि
तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते
तदनन्तरम् ॥ ५५ ॥
(श्रीकृष्ण या
गोष्टीवर भर देतात की, केवळ शुद्ध
आणि प्रेमपूर्ण भक्तीद्वारेच त्यांना त्यांच्या खऱ्या, वैयक्तिक स्वरूपात जाणता येते — केवळ निराकार 'ब्रह्म' म्हणून नव्हे, तर रूप, गुण आणि लीलांनी युक्त अशा 'परमेश्वर' (भगवान) या रूपात).
या श्लोकावरच्या निरूपणासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सुमारे ११० ओव्या लिहिल्या आहेत - त्यातल्या आठ
ओव्या माझ्या आवडीच्या आहेत. या माझ्या रोज ऐकायच्या लिस्टमध्ये आहेत. त्या ओव्या
अश्या :
देव सांगताहेत:
जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु ।
अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु ।
आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु । अभय मी
आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु । सर्व
मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।
स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु ।
व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु ।
समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥
ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया
अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥१२००॥
ज्ञानेश्वरीतल्या पसायदानाइतकेच सुंदर असे हे
काव्य आहे. देव अर्जुनाला स्वतःबद्दल सांगता आहेत. अत्यंत गेय असलेल्या या ओव्या
अर्थानेही आशयघन आहेत. मी ज्ञानेश्वरीचा गाढ अभ्यासक नव्हे, पण याचा गोळाबेरीज अर्थ (जो मी दोन पुस्तकातून
एकत्र करून तयार केला आहे!) तो असा ...
(देव सांगताहेत ...) मी
जन्मरहित आहे, वृद्धपणरहित आहे, मी नाशरहित आहे, मी अपूर्व (विलक्षण) आहे, मी
अपार (अमर्याद) आहे व मी आनंद आहे, मी
आपल्या स्थानापासून भ्रष्ट न होणारा आहे, मी अंतरहित आहे, मी
द्वैतरहित आहे, मी सर्वांच्या
आरंभीचा आहे, निराकार व साकारही मीच
आहे. नियम्य मी आहे, नियामकही मीच
आहे, मी आरंभरहित आहे, मी अमर आहे, मी भयरहित आहे, मी सर्वांचा
आश्रय आहे व आश्रितही मीच आहे. मी स्वामी व निरंतर असणारा आहे व स्वत:सिद्ध व अखंड
आहे, मी सर्व आहे, सर्वव्यापी आहे, मी सर्वांच्या पलीकडला आहे. मी नवा व जुना आहे, मी शून्य आहे व मी संपूर्ण आहे, जे काही मोठे आहे व सूक्ष्म आहे ते मी आहे. मी क्रियारहित आहे, मी एक आहे (अद्वितीय आहे). मी संगरहित व
शोकरहित आहे. व्याप्य व व्यापक मी आहे, उत्तमपुरुष मी आहे. मी शब्दरहित व कर्णरहित आहे. मी रूपरहित व कुळरहित
आहे. मी सारखा व स्वतंत्र आहे. सर्वांहून पलीकडचे जे ब्रह्म ते मी आहे. याप्रमाणे
मला एकाला या अद्वयभक्तीने आत्मत्वेकरून (आत्मपणाने) खरोखर जाणतो, आणि याही बोधाला (अनुभवाला) जाणणारा तोही मीच
आहे हे जाणतो..
या विश्वात जे काही तुला जाणवते आहे, दिसते आहे, भावते आहे, जे जाणिवेच्या
पलीकडचे आहे - ते सर्व काही मी आहे! अर्जुनाला त्याच्या कर्माची आठवण करून देताना
त्याच्या मनात उठलेल्या शंकेचे निरसन करताना केलेला हा उपदेश, माउली खास त्यांच्या शैलीत विशद करून सांगता
आहेत आणि त्यांची प्रतिभा या उपदेशाचे वर्णन कसे करू या भावनेने उचंबळून आली आहे!
'हे विश्व म्हणजे
मी. तू फक्त माझा अंश!', असं भगवान सांगताहेत.
असंच आवडलेलं रोज ऐकत असलेलं अजून एक स्तोत्र
म्हणजे - आदि शंकराचार्य रचित निर्वाण षटकम. गुरूंच्या शोधात निघालेला आठेक
वर्षांचा बाळ शंकर नर्मदातीरी गोविंदस्वामींकडे पोहोचला आणि मला आपला शिष्य म्हणून
स्वीकार करा अशी विनंती त्याने केली. "तू कोण?"
असा प्रश्न त्यांनी स्वाभाविकपणे केला तेव्हा आपले नाव, जात किंवा वंश सांगण्याऐवजी, बाल-शंकराने उत्स्फूर्तपणे हे सहा श्लोक
गायिले.. आख्यायिका अशी आहे की, शंकराने
लहानपणीच (वयाच्या पाचव्या वर्षी?) याचा
विचार केला होता! हे उत्तर 'निर्वाण
षटकम' या नावाने प्रचलित आहे.
मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं । न च
श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः ।
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः । न वा
सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु ।
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ । मदो नैव मे
नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
।चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं । न
मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता ।
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः । पिता
नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं ।
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥
अहं निर्विकल्पो निराकाररूपो ।
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः ।
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥
खूप लोकांनी अत्यंत सुंदर चालीत गाऊन हे स्तोत्र
आज internet वर उपलब्ध करून दिले
आहे.
हे स्तोत्र प्राचीन वैदिक शिकवण असलेल्या 'नेति-नेति' — म्हणजेच "हे नाही, हे
नाही" — या तत्त्वाचा व्यावहारिक आविष्कार आहे. आपण जे नाही आहोत, त्या गोष्टींचे आवरण दूर करून आपण 'आपण खरोखर काय आहोत' या परम सत्यापर्यंत पोहोचायचा हा प्रयत्न आहे!
पहिले दोन श्लोक आपल्याला आठवण करून देतात की
आपले विचार, भावना आणि भौतिक डोळे
किंवा कान ही केवळ साधने आहेत, ती
चालवणारे (कर्ता) नाही. मी अहंकार किंवा स्मृती नाही: आत्मा हा भूतकाळातील अनुभव, आवडीनिवडी, नापसंती किंवा इच्छांनी कलंकित झालेला नसतो. मृत्यूचा मला स्पर्श होत नाही
- खरा 'स्व'
(आत्मा) कधीच जन्मलेला नाही आणि तो नाशही पावत नाही. 'निर्वाण षटकम्' ही परम मुक्तीची अनुभवाधिष्ठित घोषणा आहे. हे काव्य साधकांना आठवण करून
देतं की ते सांसारिक भ्रमात अडकलेले आणि दुःख भोगणारे मर्यादित जीव नसून, ते स्वतः अनंत आणि आनंदमय चैतन्य आहेत.
या विश्वातील सर्व भौतिक अनुभूतींपलिकडे असणारे
सत्य - 'शिवस्वरूप चेतना मी आहे' - हे या सहा श्लोकांना जोडणारे सूत्र आहे!
हा अर्थ
सुद्धा मला जाणवलेला अर्थ आहे - मी कोणी या क्षेत्रातील अधिकारी माणूस नाही - तसा
माझा दावाच नाही. पण या दोघांना जोडणारा एक दुवा मला जाणवला म्हणून या लेखाचा
प्रपंच!
गीताभाष्यात अनादि-अनंताचा अवतार असलेले
श्रीकृष्ण आपल्या भक्ताला आश्वस्त करताहेत - "अरे, तुझे सगळे अनुभव म्हणजे मी. तुला वेगळं अस्तित्व नाही! (म्हणून तुला
कर्मफळाची चिंता करण्याची गरज नाही!)"
तर दुसरीकडे एक ज्ञानी व्यक्ती सांगते आहे - "माझे अनुभव म्हणजे मी
नाही, त्या पलिकडे असलेले परमचैतन्य, परमसत्य हेच मी आहे!"
ज्ञानेश्वरीतील काव्य हा विचार सकारात्मक
पद्धतीने मांडते. यात स्वतः देव, 'मी
कोण आहे' हे सांगत आहेत. निर्वाण
षटकम मध्ये शंकराचार्य 'मी कोण नाही' हे सांगत तोच विचार मांडत आहेत! शंकराचार्य वेद, उपनिषदातील 'न इती, न इती' (नेती नेती) या तत्वाने 'मी ईश्वराचा अंश आहे!' याचा पुरस्कार करताना दिसत आहेत. "मी शरीर नाही. मी मन नाही. मी
विचार, आचार नाही. मला जन्म नाही, मला मृत्यही नाही!" आणि असं सर्व नाकारत -
शेवटी जे उरलं - ते ब्रह्म मी! हा विचार निर्वाण षटकम मध्ये आहे!
शंकराचार्य नवव्या शतकातले तर ज्ञानेश्वर महाराज
तेराव्या शतकातील! दोघांच्याही आयुष्याचा कालावधी लहान. ज्ञानेश्वर महाराजांनी
२१व्या वर्षी समाधी घेतली तर शंकराचार्यांचा आयुष्यकाल ३२ वर्षांचा! आपापल्या
छोट्याच आयुष्यकालात दोघांनीही भरीव कार्य केले. ज्ञानेश्वर महाराजांनी
भक्तीमार्गाचा तर शंकराचार्यांनी अद्वैत मार्गाचा पुरस्कार केला.
भारतीय जनमानसात दोघांनाही अनन्यसाधारण प्रेम
आणि आदर मिळाला! एक महत्त्वाचा विचार या दोन्ही महानुभावांनी वेगवेगळ्या पद्धतीने
सुंदर रचनांमधून मांडला! आपण भाग्यवान. माऊलींचा आधार घेत म्हणतो (ज्ञानेश्वरी
अध्याय ६-३) -
कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय
सेविजे ।
कीं तेंचि चवी करुनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥ ६।३ ॥
आपले दैव (भाग्य) किती थोर आहे, हे सांगता येत नाही! ज्याप्रमाणे एखाद्या
अत्यंत तहानलेल्या माणसाला पाणी प्यायला मिळावे आणि तो ते पिऊन पाहत असतानाच
त्याला समजावे की अरे, हे तर
साक्षात अमृतच आहे!
तसे हे दोन अमृतकुंभ. वेगवेगळ्या रंगाचे पण
दोन्हीही अमृतानेच भरलेले! माझं वय वाढलं म्हणालो ते यासाठी. या दोन काव्यांमधली
संगती काही स्वतंत्रपणे जाणवली हे वय 'वाढल्याचं' लक्षण!
अभिजित टोणगांवकर/ जुलै
– २०२६