पाणीदार मठ्ठा
अशात एका मित्राला मी पूर्वी लिहिलेलं काही हवं होतं. त्याच्याकडून ते डिलीट झालं होतं. ते शोधायला मलाही जरा वेळ लागला. पण शोधता शोधता जुनं लिहिलेलं परत बघावं लागलं. आपलेच जुने फोटो बघायला कधी छान वाटतं तसं मीही मीच पूर्वी लिहून ठेवलेलं वाचण्यात गुंग झालो.
वाचतांना दोनतीन गोष्टी लक्षात आल्या. पहिली म्हणजे माझी लिहिण्याची एक शैली आहे - सध्याच्या मराठीत ज्याला स्टाईल म्हणतात ती. मला फार गंभीर लिहिता येत नाही! लिखाण फार गंभीर व्हायला लागलं की माझ्या लिखाणात काही फालतूपणा असतो. विनोद असतो (बऱ्याच वेळा तो विनोदाचा केप्र (केविलवाणा प्रयत्न!) असतो, हा भाग वेगळा). या नादात काही गंभीर, क्वचित महत्वाचा मुद्दा माझ्या लिखाणात उठून दिसता दिसता निसटून जातो का काय अशी शंका मनात यावी इतपत.
दुसरं असं, की मी लिहितो त्यात मुद्दा कमी आणि फापटपसारा जास्त असंही असतं. एखाद्या AI program ला माझा लेख देऊन 'यातले मुख्य मुद्दे सांग' असं विचारलं तर तो program याचं उत्तर नक्की काय द्यायचं यासाठी बुचकळ्यात पडण्याची शंका जास्त आहे. माझ्या लिखाणात बरेचदा माझे अनुभव डोकावतात. माझ्या आजूबाजूची मंडळी (बऱ्याच वेळा बायको) असतात. म्हणजे माझे सगळे अनुभव जर लिहून झाले तर नवीन काही लिहायला माझ्याकडे काही उरणार नाही! 'कल्पना' - एखाद्या न घडलेल्या गोष्टीची गोष्ट - हे माझ्या लिखाणात फार कमी वेळा दिसतं. तिरकस लिहिण्यात माझी प्रतिभा जास्त रमते. कल्पनाविलास तिला फार आवडत नाही. कदाचित यामुळेच मी लेख जास्त लिहितो, कथा कमी - जवळजवळ नाहीच - लिहितो. आयुष्याबद्दल काही फार गहन, गंभीर, एखादं परम सत्य असाही विचार मी मांडत नाही. माझं आयुष्य चाकोरीबद्ध आहे. त्यात फार नाट्यमय प्रसंगाची रेलचेल नाही - मग माझ्या लिखाणात तरी ती कुठून येणार?
हे का जाणवलं? तर एकदा विमानतळावर कुणाला तरी आणायला गेलो असताना तिथे दोनेक तास वाट पहात होतो. तेव्हा तिथे असलेल्या एका मेडिकल बूथवरच्या दोन मुलींबद्दल (त्यांना काहीच काम नसल्याबद्दल) मी एक लेख लिहिला होता - फार मोठा नाही - चारपाच परिच्छेद असतील. मित्रांच्या ग्रुपवर पाठवला. नेहेमीप्रमाणे 'शांततेने' त्याचं स्वागत (असं मी म्हणतो. मित्रांनी बहुधा दुर्लक्ष केलं!) झालं, पण एकाने लिहिले - 'लेख छान आहे. एकतर शुद्ध मराठीत आहे आणि जिथे मुळात काही विषयच नाही तिथे तू पन्नास ओळी खरडल्या आहेस! त्यासाठी तुझं कौतुक!'
त्यावेळी काही वाटलं नाही पण आज परत एकदा माझेच लेख वाचताना ती कॉमेंट आठवली. मग प्रत्येक लेख वाचताना, या लेखात मला काय सांगायचंय - याचा विचार करायला लागलो. फार काही त्यात नसतं, हे जाणवून गेलं. आणि प्रकर्षाने जाणवलं असावं कारण यावेळी ते खुपलंच.
हे असं आहे तर मग मी का लिहितो? माऊली म्हणून गेल्यात - 'राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोन काय कवणे, चालाविचे ना!' या धर्तीवर मला वाटतं म्हणून मी लिहितो हे एक. शब्दसृष्टिचा मी ईश्वर तर नक्कीच नाही - पण त्या सृष्टीत मी एखादा कारकून, गेला बाजार चपराशी तरी असणार. त्यामुळे मी लिहितो! मला लिहावं लागतं!
दुसरं असं, की 'चला, आता आज शंभर ओळी लिहायच्या आहेत' असं म्हणत मी कधीच लिहू शकत नाही. कधीतरी अचानक डोक्यात चक्र फिरायला लागतात. लिहिल्या शिवाय चैन पडत नाही - मग एकामागोमाग एक शब्द टाईप होत जातात. लेख तयार होत जातो. सांगण्यासारखं फार काही नसतंच, पण शब्दांचा कापूस पिंजला जातो. वजन वाढत नाही, पण बरंच काही मोठं आहे असा मात्र आभास मी देत राहतो.
बरं, एकदा लिहिलेलं परत तेच लिहिता येत नाही. डोक्यात असलेली शब्दरचना डोक्यातून बाहेर पडून कागदावर (स्क्रीनवर!) उमटली, की ती बाहेरच पडली. परत तशीच जमणं महामुश्कील. सटवाईला जसं नवजात शिशूच्या कपाळावर आपण भविष्य काय लिहिणार आहे हे लेखणी कपाळावर टेकवेपर्यंत माहीत नसतं, तसंच माझ्या मनातला विचार काय शब्दरचना घेऊन बाहेर पडणार आहे, याचं मलाही कुतूहल असतं!
तिसरं observation असं की मी दोन तीन पानी लेख लिहितो. ही सुद्धा एक मर्यादा आहे. कदाचित ते वर लिहिलेल्या पहिल्या मुद्द्याशी निगडित आहे. कथाबीज छोटं असल्याने त्यात किती पाणी घालून वाढवणार? लिखाण आहे, मठ्ठा नाही! पण सध्याच्या low attention spanच्या जमान्यात माझे थोडेफार वाचक टिकून राहायला त्याची मदत होत असावी!
डोक्यात वाफ दाटली की लिहायचं हे माझं प्राक्तन असावं. कुणी वाचक असो नसो, मी स्वतः एक हक्काचा वाचक माझ्या लिखाणासाठी नक्कीच आहे. तो वाचक चोखंदळ आहे. तोही माझ्या शैलीच्या प्रेमात आहे, आयुष्यासाठी काही गहन, गंभीर विचार आहे का या बाबतीत तो फार पर्टिक्युलर नाही. काही छान, मिस्किल वाचायला मिळतंय ना - एवढंच तो बघतोय. जोपर्यंत तो वाचतोय, तोपर्यंत लिहायला मला प्रॉब्लेम नाही!
अभिजित टोणगांवकर / सप्टेंबर - २०२६
0 Comments:
Post a Comment
<< Home