Red ramblings

Red ramblings are about my experiences in Shanghai life. My observations - colored by my viewpoint :-)

Wednesday, August 05, 2026

विनम्रतेचा वटवृक्ष

 विनम्रतेचा वटवृक्ष

“महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती!” ज्या मराठी मुलाने/मुलीने MCQ च्या पलिकडे मराठीचा अभ्यास केला आहे, निबंध वगैरे लिहिले आहेत, त्या प्रत्येकाने/कीने ही म्हण एकदा तरी नक्की वापरली आहे. अर्थ सोपा आहे - महापूराच्या पाण्याच्या लोटाने ताठ उभे असलेले, वाकू न शकणारे वृक्ष मुळासकट उखडले जातात तर गवताची पाती पाण्याबरोबर वाकल्याने तग धरून राहतात! अंगी नम्रता असेल तर मोठ्या संकटातूनपण बाहेर पडता येते हे सांगण्याचा उद्देश! 

पण वृक्ष हा मानी असतो, ताठ असतो - हे यात अंतर्भूत आहे. महापूर असो वा नसो, वृक्ष न वाकणाराच! मग एखादा वृक्षासारखा उंच असूनही वाकणारा असेल तर? ज्ञानेश्वरी वाचताना वारंवार याचा प्रत्यय येतो. वयाच्या सोळाव्या वर्षी अमृतानुभव सांगणारे ज्ञानेश्वर - थोरच. तिथे काही वाद नाहीच. पण तरीही ज्ञानेश्वरीत ठायी ठायी ज्ञानेश्वरांनी 'मी सर्वज्ञानी नाही! मी जरी हे सांगतो आहे तरी माझ्याही पेक्षा माझे गुरू थोर आहेत. किंबहुना त्यांच्या शिकवणीमुळेच मी हे करू शकत आहे', अशी ग्वाही माउली वारंवार व्यक्त करतात. 

अगदी ही पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक ६३ बघा: 

हे सलगीं म्यां म्हणितले । चरणां लागोनि विनविलें ।

प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ॥१-६३॥

    माऊली आपले गुरू श्री निवृत्तीनाथ यांना वंदन करत आहेत आणि ग्रंथ लिहिण्याची अनुज्ञा (परवानगी) मागत आहेत. गुरूंचे मोठेपण सांगताना आणि स्वतःची लीनता व्यक्त करताना ते अत्यंत प्रेमाने आणि हक्काने गुरूंच्या चरणी लीन झाले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, मी आतापर्यंत जे काही बोललो, ती कोणतीही प्रौढी किंवा अहंकार नसून, केवळ तुमच्या चरणांशी असलेली माझी 'सलगी' म्हणजेच लडिवाळपणा, प्रेम आणि हक्क आहे.  मी तुमच्या चरणांवर डोके ठेवून ही विनंती करत आहे. हे प्रभू (गुरूमाऊली), तुमचे हृदय अथांग आणि गंभीर आहे. समुद्राप्रमाणे तुमच्याजवळ अगाध क्षमा आणि प्रेम आहे. माझ्याकडून बोलण्यात काही कमी-जास्त किंवा धीटपणा झाला असेल, तरी तुमचे हृदय इतके विशाल आहे की तुम्ही माझ्या या लडिवाळपणाचा कौतुकाने स्वीकार कराल, हा मला पूर्ण विश्वास आहे. इथे ज्ञानेश्वर महाराजांची अथांग नम्रता दिसून येते. ज्ञानाचा सागर' असलेले माऊली आपल्या गुरूंसमोर किती लहान होतात आणि अत्यंत प्रेमाने आपल्या चुका पदरात घेण्याची विनंती करतात, हे या ओवीतून शिकण्यासारखे आहे.

आता नवव्या अध्यायाच्या सुरवातीच्या या दोन ओव्या पहा: 

परि प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं ।

देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥९-२॥

    हे संतांनो, मी तुमच्या सर्वज्ञांच्या सभेमध्ये कसल्याही गर्वाने किंवा मोठेपणाने बोलत नाही. तुम्ही माझे म्हणणे ऐकून घ्या, ही माझी अत्यंत नम्र आणि लाडाची विनंती आहे.

कां जे लळेयांचे लळें सरती । मनोरथाचे मनौरे पुरती ।

जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हा ऐसी ॥९-३॥

    जसा एखादा लाडका बालक आपल्या माहेराशी किंवा आईशी जसा हट्ट करतो आणि त्याचे सगळे लड पुरवले जातात, तसेच तुमचे ज्ञानभांडार अफाट व श्रीमंत असल्याने मी तुमच्यासमोर माझ्या मनातील हट्ट मांडत आहे. 

    लक्षात घ्या, गीतेवरील पहिल्या आठ अध्यायांवरची टीका यावेळपर्यंत पूर्ण झालेली होती - माऊलींच्या प्रतिभेचा, गाढ अभ्यासाचा आवाका सगळ्यांच्याच आतापावेतो लक्षात आला असणार! तरी सुद्धा समोर बसलेल्या विद्वान तसेच जनसामान्यांचा आदर करत माऊली आपली नम्रता व्यक्त करत आहेत. किती अजून उदाहरणं देऊ? ज्ञानेश्वरीचे अभ्यासक अजून शंभर उदाहरणे - याही पेक्षा जास्त परिणामकारक देतील. पण माझा काही तेवढा अभ्यास नाही.

    या बाबतीतल्या दोन ओव्या मात्र माझ्या फारच आवडीच्या आहेत दोन्ही ओव्या अठराव्या अध्यायात शेवटी शेवटी येतात. म्हणजे गीतेतल्या शेवटच्या श्लोका वरचे भाष्य माऊलींनी पूर्ण केलेलं आहे, आता संपूर्ण ग्रंथ संपल्यानंतर माऊलींच्या मनात येणारे विचार आणि एक काम छान पद्धतीने पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत असण्याच्या या ओव्या आहेत. त्यातली एक ओवी ही पसायदानाच्या सुरुवातीला येते. ती अशी -

किंबहुना तुमचे केले ।धर्मकीर्तन सिद्धी नेले ।

आता माझे जे उरले । पाईकपण ॥ १८- १७९३॥

    ही ओवी वाचताना माझ्या डोळ्यासमोर एक प्रसंग येतो. माऊली पैसाच्या खांबाला टेकून बसलेले आहेत. थोडासा विचार करत, एक एक ओवी सांगत आहेत. शेजारी सच्चिदानंद बाबा आपली लेखणी घेऊन सज्ज आहेत. समोर श्रोतृवृंद बसला आहे. त्यात विद्वान मंडळी आहेत. नेवाश्यातली सर्वसामान्य शेतकरी मंडळी आहेत. पुढच्याच रांगेत पण अगदी समोर नाही, डावीकडे निवृत्तीनाथ महाराज आहेत. त्यांच्या शेजारी सोपानदेव. बायकांमध्ये पुढच्या रांगेत मुक्ताबाई  बसलेल्या आहेत. सगळेजण तल्लीन होऊन ऐकत आहेत, आणि ही ओवी म्हणण्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांकडे थोडेसे वळत, हात जोडीत म्हणत आहेत, 'किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तनासिद्धी नेले". माऊली म्हणत आहेत की, 'हे गुरुदेवा, तुमच्या आज्ञेमुळे, तुम्ही दिलेल्या ज्ञानामुळे, जे काही मला मिळालं होतं त्यातून मी हे धर्म कीर्तन केलं.' गीते सारख्या उपनिषदांचे सार असलेल्या ग्रंथावरची टीका, एक स्वतःचा ज्ञानमार्गावरचा एक विचार या भाष्यातून या सोळा वर्षाच्या मुलाने संपूर्ण केलेला आहे. हा वेळेतो साडेआठ हजार ओव्या लिहून झालेल्या आहेत. आणि तरीसुद्धा माऊली आपल्या गुरूंकडे वळून म्हणतात की, 'अहो, हे फक्त तुम्ही आणि तुमच्यामुळे झालं! आता जे माझ्याकडे उरलं आहे, सगळं सांगून झाल्यावर - ते म्हणजे तुमचं शिष्यत्व. या पलीकडे माझ्याकडे आता काहीही नाही. इतका मी लीन दिन आहे.'

    यावरती ज्ञानेश्वर माऊलींच्या नम्रतेचा मी आणखीन काय वर्णन करू? अशीच आणखीन एक ओवी ही या ओवीच्या काही ओव्या आधी येते. त्यात माऊली म्हणतात

राजहंसाचे चालणे  ।  जगी जालिया शहाणे ।

म्हणून काय कवणे  ।   चालावीचे ना  ॥ १८-१७१४॥

    शब्दार्थ साधा आहे राजहंसाचे चालणे मोठं डौलदार असतं, पण म्हणून इतर प्राण्यांनी, इतर पक्षांनी चालूच नाही असं आहे का? अर्थातच माऊली म्हणतात की मी कदाचित फार मोठा विद्वान किंवा  प्रकांड पंडित नसेनही, पण म्हणून मला जे काही सांगायचं आहे ते सांगण्याचा हक्क नसावा का?  म्हणजे या माणसाची विनम्रता बघा. तिथे समोर बसलेल्या काय, त्यांच्या कालखंडा पासून आता सात शतके गेली, पण त्यांच्या इतका प्रतिभावान अजून पुढे आलेला नाही.  इतका ज्ञानी माणूस झाला नाही. तरीसुद्धा माऊली मात्र काय म्हणतात? 'मी एक साधा माणूस आहे, पण मला काहीतरी सांगायचे आहे, ते मला सांगू द्या!'  

    काही लोकांचा विनम्रपणा मानभावी वाटतो. शब्द आणि वर्तन यात काहीतरी गफलत असते. जरी शब्द नम्रतेचे असले तरी त्या काही आढ्यता वाटत राहते - माऊलींचे शब्द त्याउलट खरे वाटतात. ही मोठी व्यक्ती प्रत्यक्षात अतिशय कनवाळू असणार असे वारंवार वाटत राहते. हा अगदी मनाच्या आतून येणारा नम्रभाव कणभर तरी आपल्या अंगी यावा असं वारंवार वाटत राहतं! 

    विनम्रता म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेणे का? मानसशास्त्र काही वेगळेच सांगते. ज्या व्यक्तीला स्वतःबद्दल, स्वतःच्या कौशल्याबद्दल, ज्ञानाबद्दल, कर्तृत्वाबद्दल अभिमान असतो, विश्वास असतो, मला काय माहित आहे आणि काय नाही याची जाणीव असते,  तीच व्यक्ती विनम्र असू शकते. त्या व्यक्तीलाच विनम्र असणे परवडते! अश्या व्यक्तीला 'मी कोणी महान आहे' अशी बतावणी करण्याची जरुरी नसते. अश्या व्यक्ती समोरच्याला ती 'आहे तशी' स्वीकारू शकतात. ज्ञानेश्वरी सांगताना माउलींना याची जाणीव नक्की झाली असणार आणि तरीही त्यांच्या विचारातून ओवी येते - 'किंबहुना तुमचे केले ...' आणि 'परि प्रौढी न बोलें हो जी ..'. एका सशक्त आत्मविश्वासातून येणारे हे विचार आहेत. त्यांना कुणालाच काही सिद्ध करून दाखवायचे नव्हते. आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्याशिवाय कुणाच्याच पसंतीची इच्छा नव्हती. माझ्या गुरूंनी मला स्वीकारावे एवढीच त्यांची अपेक्षा होती.

    मी मोठा आहे, जास्त ज्ञानी आहे हे माहित असूनही अहंकार नाही, इतरांना कमी लेखणे नाही, माझ्याकडचे ज्ञान इतरांना देऊन मी माझयासाठीच स्पर्धक तर तयार करत नाही ना - ही भीती नाही, उलट मी देतो ते तुम्ही घ्या आणि पुढे न्या हा विचार आहे - त्यातून आत्मविश्वास येतो.  त्यातून अंगात विनम्रता येते. 

    विनम्रतेचं यापेक्षा जास्त उदाहरण काय असावं? या प्रकारची विनम्रता कणभर तरी आपल्या अंगी यावी यासाठी आता अट्टाहास करायचा. 'शेवटचा दिस' गोड होवो अथवा न होवो, पण तोपर्यंत अशी विनम्रता थोडी तरीअंगी यावी हे मात्र मागणं मी नक्की मागेन! 

अभिजित टोणगांवकर / ऑगस्ट २०२६

0 Comments:

Post a Comment

<< Home