संध्याकाळ
आज बऱ्याच दिवसांनी पहाटे ते फिरायला बाहेर पडले होते. चार वर्षांपूर्वी काका निवृत्त झाल्यानंतर पहाटे एक चक्कर मारण्याची दोघांची सवय झाली होती. अर्थात 'बरोबर' हे नुसतं नावाला होतं - काकांची चालच थोडी जलद होती. अगदी त्यांनी स्वतःही कितीही प्रयत्न केला तरी काकूंच्या चार पावले पुढेच जायचे. मग त्यांच्या लक्षात आलं की काकूंसाठी थांबायचे - पण परत दोन पाच मिनिटात परत पुढे! चोवीस तास बरोबर असल्याने खास बोलण्यासारखं फार काही नसायचं. दोघं आपापल्या विचारात मग्न असायचे.
पण या दिनक्रमात गेले दीड महिना खंड पडला होता. निमित्त किरकोळीने सुरू झालं होतं. चालताना एका मोटरसायकलवरच्या मुलाचा धक्का लागून काका पडले. अचानक समोर आलेल्या एका मुलीला वाचवायला त्याने ब्रेक मारला, त्यात त्याचा तोल गेला, तो काकांवर येऊन पडला! मुलगा भला होता. त्याने डॉक्टरांकडे जायला मदत केली - पण ते पडणं दोन दिवस पुरवलं! मग ही तपासणी, त्यातून दुसरी असं करत ॲंजिओप्लास्टीपर्यंत वेळ गेली - एका रक्तवाहिनीत स्टेंट टाकावा लागला. त्याचं बाळंतपण वेगळंच. पण काही त्रास होण्याअगोदर प्रॉब्लेम लक्षात आला म्हणून सगळ्यांनी निःश्वास टाकला!
दोघांचाही आप्त-मित्र परिवार मोठा. येणाराजाणारा बराच पुरवला. आधार वाटला, पण काकूंना आल्यागेल्याचं चहापाणी बघावंच लागलं. त्यामुळे काकूंच्या एका मैत्रिणीने 'आमचं फार्महाऊस आहे जवळच, तुम्ही आठवडाभर का जाऊन येत नाही?' असा प्रस्ताव दिल्यावर दोघांनीही उचल खाल्ली आणि इथे आले होते. फार्महाऊस ठीकठाक होतं. रखवालदाराचं एक कुटुंब व्यवस्था बघायला होतं. त्यामुळे काकूंच्या मागची स्वयंपाकाची कटकट संपली होती. 'अगं शांती!' अशी हाक दिली की पाहिजे ते हजर होत होतं!
दोन दिवस असे सुखात गेल्यावर 'आता आळस फार झाला!' असं म्हणत ते आज सकाळी फिरायला बाहेर पडले. दोघंही आपापल्या विचारात. चालत. पण आज फरक हा होता की काकू काकांच्या पुढे होत्या आणि काकांसाठी त्या थांबत होत्या! 'अहो काही होतंय का? परत जाऊया का?' त्यांनी विचारलं सुद्धा. पण 'छे छे, मी अगदी व्यवस्थित आहे - चल हो तू पुढे' म्हणत काकांनी त्यांना आश्वस्त केलं होतं. फिरताना एकदोनदा तरी काकूंनी परत त्यांना विचारलंच ...
फार्म हाऊसवर परत आल्यावर चहासाठी हाक मारायला काकू वळल्या तोच शांती पाणी, वाफाळलेले चहाचे कप, आणि बिस्किटे घेउन बाहेर आली. 'म्या पाहिलं तुम्हाला कोपऱ्यावर वळताना. मग ठेवलाच चहा. पण अक्षी वेळ लागला तुम्हाला! चहा थंड नाही झाला ना बघा तेवढ्यात.' म्हणत शांती वळली.
चहा घेत काकू परत म्हणाल्याच, 'एरवी तुम्ही पुढे जाऊन माझ्यासाठी थांबता. आज उलटं झालं. परत गेल्यावर डॉक्टरांकडे जाऊनच येऊया.' थोडं मंद हसत, काका म्हणाले, 'अगं, मी खरंच ठीक आहे. माझ्या डोक्यात काही चालू असलं ना की मी माझ्याही नकळत मी फास्ट चालतो! मग तू मागे राहीली आहेस हे लक्षात आलं की थांबतो. पण परत तेच. आता मनातले विचार संपलेत. शांत वाटतंय - तेव्हा तुला मी हळू चालतोय असं वाटतंय एवढंच!'
काकू काही बोलल्या नाहीत पण काका कितीही 'मी ठीक आहे' म्हणाले आणि आता सकाळ असली तरी आपल्या सहजीवनाची संध्याकाळ चालू झालीय एवढं मात्र त्यांना समजून चुकलं!
अभिजित टोणगांवकर/ऑगस्ट - २०२६
0 Comments:
Post a Comment
<< Home