Red ramblings

Red ramblings are about my experiences in Shanghai life. My observations - colored by my viewpoint :-)

Thursday, August 06, 2026

प्रेमाचा अर्थ

 प्रेमाचा अर्थ 


विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. पिंपळाच्या झाडावर लटकणारे वेताळाचे प्रेत खांद्यावर टाकून तो पुन्हा स्मशानाच्या दिशेने निघाला. प्रेताला स्मशानात पोहोचवताना मौनव्रत धारण करण्याची अट असल्याने तो न बोलता चालत होता. वेताळाला विक्रमादित्याचे मौनव्रत तोडायचे होते. विक्रमादित्याला बोलते करण्यासाठी वेताळ म्हणाला " राजा… तुझ्या सहनशक्तीची व चिकाटीची खरच कमाल आहे. मला स्मशानात पोहोचवण्याच्या प्रयत्नात तुला कित्येकदा अपयश  येवूनही तू पुन्हा पुन्हा चिकाटीने प्रयत्न करतोस. तुला कंटाळा येऊ नये म्हणून तोपर्यंत मी तुला एक गोष्ट सांगतो व तुला काही प्रश्न विचारतो. तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळण घेऊ लागतील."

वेताळाने गोष्ट सांगायला सुरवात केली.… 


"एक आटपाट नगर होते. ते महाशृंग राज्याची राजधानी होते. आता महाशृंग या नावाला अर्थ काय, असं विचारायचं नाही. हे नाव आता परत आपण या गोष्टीत ऐकणार नाही. पण राजधानी आहे म्हटल्यावर राज्य‌ पाहिजे, म्हणून आता मला सुचलेलं नाव" वेताळाने विनोद करायचा केप्र (केविलवाणा प्रयत्न!) केला. विक्रमादित्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले हे पाहिल्यावर वेताळ पुढे बोलू लागला - "राजा वयोमानानुसार तुझी विनोदबुद्धी कमी होत चालली आहे असे दिसते, नाहीतर तू हसला असतास. असो. तर आटपाट नगर होते. तिथल्या राजाला दोन मुले होती. मोठा चंद्रकांत आणि धाकटी तारका. चंद्रकांत हुशार, रुबाबदार आणि शुरवीर होता. मुख्य म्हणजे त्याचं लग्न झालं होतं आणि राजगादीची त्याची लाईन क्लिअर होती. त्यामुळे तो सुद्धा या कथेत आता येणार नाही! 

तर  तारका. यथावकाश ती उपवर झाली. मग 'एवढ्यात मला नाही बाई लग्न करायचं' वगैरे नाटकं तिने काही दिवस केली. मग राजाने तिला अल्टिमेटम दिला तसा तिने स्वयंवर करण्याचा मानस जाहीर केला. 


तिच्या स्वयंवराच्या घोषणेमुळे राज्यातल्या उपवधू तरुणांमध्ये उत्साह संचारला. तलवारबाजी, नेमबाजी, गदायुद्ध वगैरे कोचिंग क्लासेसवाल्यांनी स्पेशल क्लासेस उघडले. बऱ्यापैकी धंदा करून घेतला. पण तारकेने जो पण जाहीर केला ते ऐकून सगळ्यांचेच धंदे बसले. 


तारका म्हणाली, 'जो युवक माझ्या महालासमोर कमीतकमी बारा महिने चोवीस तास उभा राहून पहारा देत माझ्यावरचे प्रेम मला दाखवेल त्याला मी वरेन." मग कोणी शंका काढली की 'जर दोन युवक यात पास झाले तर?' तेव्हा तारका म्हणाली मग कुणी एक उरेपर्यंत मी वाट पाहीन! उत्तीर्ण होणारा युवक राजाचा घरजावई होणार असल्याने त्याला उत्पन्नाची अट नव्हती पण एकुण तब्येत, minimum पदवीधर असणे, बऱ्यापैकी दिसायला असणे या आणि अशा इतर काही qualifying conditions होत्या. 


'एक वर्ष म्हणजे जरा टू मचच हं' तारकेची एक मैत्रीण कुजबूजलीच. एरवी तिला तारका रागावली असती पण ती म्हणाली, 'तेवढीच लग्नाची कटकट एक वर्ष पुढे! म्हणून ही अट.' 'कसली मेली ही विचित्र अट!' अजून एक मैत्रीण फुदफुदली. 'जो माझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तोच माझ्यासाठी हे करेल.' तारका म्हणाली. शेवटी स्वयंवर तिचं होतं. तिचा शब्द शेवटचा होता.


तर पण चालू व्हायचा दिवस उजाडला. बरीच लग्नोत्सुक तरूण गोळा झाले. त्यातले काही रिजेक्ट झाले त्यांनी आरडाओरड करायचा प्रयत्न केला जो चंद्रकांत आणि त्याच्या सैनिकांनी व्यवस्थितच आटोक्यात आणला. तीस एक जण उरले. त्यांच्यासाठी तारकेच्या महालाबाहेर उभं राहण्याची व्यवस्था केली गेली. प्रत्येकाला बसायला एक खुर्ची दिली गेली. 


एका आठवड्यात तिसाचे दहा झाले. सगळे धट्टेकट्टे तरूण होते. नुसती वाट पहात उभं राहणं काही सोपं नव्हतं. दुपारचं उन, पहाटेची थंडी सहन करणं कठीण होतं. बरं प्रश्न बारा महिन्यांपेक्षाही जास्तीचा होता. बरेच जण तिथून निघालेच. दोन महिन्यात दहाचे चार आणि आठ महिन्यांत एकच जण - शशांक - उरला! राजकन्येवरचे त्याचे प्रेम व्यक्त करणाऱ्या कविता लिहून तो तिला पाठवत असे! तारकेबरोबरच्या भावी संसाराची स्वप्ने तो व्यक्त करत असे. पण तारकेकडून काही प्रतिसाद नसे! 


शशांकला माहीत नव्हते पण तारका त्याच्यावर लक्ष ठेवून होती. एका रात्री अचानक आलेल्या वादळपावसातही तो अचल उभा पाहून तिने आपल्या दासी मार्फत त्याला तिच्याही प्रेमाची ग्वाही दिली. त्याचा संयम, सहनशीलता - आणि हे केवळ तिच्यासाठी! 'मला याबाबत फारच आपुलकी पलिकडे काही वाटते' - तिने, खाजगीत, पण त्याच्यापर्यंत पोहोचवला! तर असं सगळं काही आलबेल चालू होतं. तारकेचं लग्न ठरलंच असं लोकांनी ठरवून टाकलं. लग्नात कुठला ड्रेस घालायचा आणि कुठलं स्वस्तातले प्रेझेंट खपून जाईल याचा विचार करायला लागले. 


इकडे राज्यात हवामान गोंधळ नेहमीप्रमाणे चालू होता. अल निनो त्याही काळात होताच. 'पापं वाढलीत जगातली' याखाली हवामानाचे चढउतार ढकलले जात होते. एका रात्री बर्फाळ थंड वारे वाहू लागले. हाडं गोठवून टाकणारी थंडी पडली. राजकन्येला शशांकची काळजी वाटत होती. त्या रात्री ती खिडकीपासून हलली सुद्धा नाही! पण शशांक टिकून राहिला! अचानक झालेल्या हवा बदलामुळे त्याच्याकडे उबदार कपडे नव्हते, पण तरीही तो आपल्या जागेवरून हलला नाही! 


वादळ आलं तसं गेलं सुद्धा. हवा परत मोकळी झाली आणि त्याचबरोबर गेले दहा महिने शशांक जिथे टिकून उभा होता, ती जागा सुद्धा मोकळी झालेली दिसली! 'गेला कुठे हा? पण पूर्ण करायच्या किती जवळ आला होता!' एकच गलका झाला! चंद्रकांताने आपले सैनिक सगळीकडे पाठवले तर तो स्वतःच्याच घरी उद्विग्न मनस्थितीत सापडला! सैनिकांनी त्याला जवळजवळ खेचतंच राजवाड्यात आणलं. 


'राजकन्ये! मी तुमच्याशी लग्न करण्यास उत्सुक नाही!' शशांकने आल्या आल्याच जाहीर केले! 'अरे, गेले साडेदहा महिने तू टिकून राहिलास. मी माझं तुझ्यावरील प्रेम व्यक्त केलं. पण पूर्ण होणे आवश्यक आहे, ती आता केवळ एक फॉर्मॅलिटी आहे. तेव्हा तुझा विचार का बदललाय?' राजकन्या जरा चिडून, पण बरीचशी वैतागून उद्गारली! 'वर्ष'भर पुढे चा तिचा आग्रह - आता 'शक्य तितक्या लवकर' मधे बदलला होता!


पण शशांकने 'थोडा विचार करा, म्हणजे तुम्हालाच समजेल!' असं म्हणत बोलणं बंदच केलं! 


"राजा, शशांकने जरी बोलणं बंदच केलं असलं तरी त्याच्या नकारामागचं कारण तुला नक्की माहीत आहे. तेवढी हुशारी तुझ्याकडे नक्कीच आहे! ती कारणमीमांसा तू सांगीतले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर छकले होऊन तुझ्याच पायावर पडतील, हे तुला चांगलेच माहीत आहे", प्रेताच्या आत दडलेला वेताळ म्हणाला! 


विक्रमादित्याने एक उसासा सोडला आणि संथ लयीत बोलायला सुरुवात केली. "शशांकने स्वयंवरात भाग घेतला तो बहुधा राजाचा जावई होऊन सुखाचे जीवन जगण्यासाठी. जसजसे दिवस जात गेले तसे त्याला विचार करायला वेळ मिळत गेला आणि राजकन्येविषयी आपुलकी वाटू गेली. एक सुस्वरूप, श्रीमंत आणि समजूतदार जीवनसाथी मिळणार या विचाराने त्याने कष्ट सहन केले. राजकन्येने जेव्हा तिची प्रेमभावना व्यक्त केली तेव्हा मात्र पहिल्यांदा त्याच्या मनात आनंदाबरोबर अपेक्षाही निर्माण झाली! राजकन्याची अट एक वर्षभर तिच्या दारात उभं राहायची होती! बर्फाळ वादळात कुडकुडत तो उभा असताना त्याला गरम कपडे देऊन त्याचा त्रास तिला नक्कीच कमी करता आला असता. पण तसं तिने केलं नाही. राजकन्या शशांकच्या प्रेमाला पात्र नव्हती. 


प्रेम म्हणजे फक्त शब्द नव्हेत तर कृती सुद्धा आली. आपल्या आवडत्या माणसासाठी वाटेल ते करण्याची तयारी हवी. शशांक स्वतः तेच करत होता.  प्रेम म्हणजे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी किती त्रास सहन करू शकता याबरोबरच ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या त्रासापासून किती आणि कशा पद्धतीने वाचवते, वाचवायचा प्रयत्न करते हेही आलं" 


"राजा, तुझ्या बुद्धीची कमाल आहे हे परत एकदा सिद्ध झाले! पण तू बोललास आणि अटीचा भंग केलास. हा मी निघालो." असं म्हणत वेताळ प्रेतासकट तिथून निघाला आणि पिंपळाच्या झाडावर परत लटकू लागला. 


अभिजित टोणगांवकर/ ऑगस्ट - २०२६

0 Comments:

Post a Comment

<< Home