बुद्ध आणि वाघोबा
बुद्ध आणि वाघोबा
माझ्या हातातला वाघोबा आता शांत होत होता. कालची रात्र भूक आणि झोप यांच्यात गल्लत करत महाशिवरात्र आणि हरतालिका एकत्र आपल्या आई-बाबांबरोबर मनवली होती. दोघंही थकले होते. बाबाला तर कामावर जाणं भाग होतं - आईने पार्सल आजीकडे दिलं आणि मग तिच्याकडून माझ्याकडे आलं! "बघ जरा तिच्याकडे. मी स्वयंपाकाचं बघते" - असं म्हणत शांत होत आलेलं वाघोबाचं गाठोडं माझ्याकडे आलं होतं.
हात बदलल्यामुळे म्हणा किंवा हवेतही थोडी थंडी होती म्हणून म्हणा, वाघोबाने माझ्याकडे आल्यावर जरा चुळबुळ केली. आळोखेपिळोखे दिले, पण भोंगा पसरला नाही. टकटक नजरेने वाघोबा मला न्याहाळत राहिला. मी असंबद्ध बडबड करत राहिलो (चयकोबाच्या मते मी नॉर्मलच बोलत होतो! असो.) वाघोबा थोडा वेळ ती ऐकत, माझ्याकडे कंटाळलेल्या नजरेने बघत, त्याच्याही नकळत झोपी गेला!
गौरी देशपांडे यांच्या उत्खनन कादंबरीत त्यांनी स्पॅनिश कवी बोर्हेजच्या कवितेचं रुपांतर दिलंय -
"चांदण्यात वाघ, सोन-काळा,
बघतो नख्या आपल्या.
पत्ताच नाही त्याला
की, पहाटे भल्या
खतम केलंय त्यांनी एका माणसाला!"
आमच्या या वाघोबाने कुणाला खतम नव्हतं केलं पण दुधासाठी आणि झोपेपायी दंगा मात्र घातला होता आणि आता दमून निवांत विसावला होता!
मग मीही सोफ्यावर बसून त्या शांत चेहऱ्याकडे बघत राहिलो. त्या घटकेला माझ्या जगात सोफा, शांतता आणि हातातलं ते निवांत पहुडलेलं बंडल - एवढंच होतं. वाघोबाच्या चेहेऱ्यावर अतीव शांतता होती. बघताबघता वाघोबाचा बुद्ध झाला होता. शांत मंद श्वास. पूर्णतया relaxed चेहरा. गोबऱ्या गालात लपू पाहणारं नकटं नाक आणि लयबद्ध श्वासाबरोबर कळत नकळत थरथरणारी तितकीच नाजूक जिवणी! आपल्या चिमुकल्या विश्वातल्या सगळ्या काळज्या, चिंता आपल्या आजोबावर सोपवून तो सानुला जीव निश्चिंतपणे माझ्या आश्वासक कुशीत झोपून गेला होता! आणि मीही मोबाईल बाजूला ठेवून, त्या शांत चेहऱ्याकडे बघत होतो. ध्यान करतानाही कधी मिळाली नाही अशी अतीव विचारहीन शांतता माझ्याही मनावर अलगद पसरली होती. मी झोपलो नव्हतो तरीही शांत झोपेमुळे मनाला येणारी तरतरी मी अनुभवत होतो.
किती वेळ आम्ही असे बसलो होतो कोण जाणे, पण आता परत बाळाची चुळबुळ सुरु झाली. शांत चेहऱ्याची घडी विस्कटली. अधूनमधून कपाळावर आठ्या, मधूनच ओठ वाकडे व्हायला लागले. माझ्या आणि त्या बालबुद्धाच्याही नकळत एक अर्धाच क्षणासाठी 'क्यॅंव' झालं! त्या अनपेक्षित आवाजाने बाळ स्वतःच दचकलं. वाघोबाने बुद्धाला बाजूला करत परत अवतार घ्यायचं ठरवलं असावं! ते 'क्यॅंव' आजीने अचूक टिपलं आणि लगबगीने बाहेर येत माझ्या हातात दुधाची बाटली ठेवली. नजरेनेच 'दे तिला' असा इशारा करत ती परत स्वयंपाकघरात गायब झाली.
परत जेव्हा वाघोबाने 'क्यॅंव' केलं तेव्हा मी बाटली वाघोबाच्या तोंडाजवळ आणली, बेसावध हरणावर झडप घालावी तशी वाघोबाने हपापलेपणे दुध प्यायला सुरुवात केली. भुक संपली तशी तेवढ्याच जोशाने बाटली झटकत डोळे चोळायला सुरुवात केली - पण मी जागा होतो! चपळाईने उभं करत वाघोबाची पाठ चोळली, तर गपगपा मिटणाऱ्या डोळ्यांनीच एक छोटी डरकाळी पोटातून बाहेर पडली. आता झोपायच्या मार्गातले सगळे अडथळे दूर झाले! भूक निमाली. किलकिल्या डोळ्यांनी आजोबा जागा आहे याची वाघोबाने खात्री करून घेतली आणि परत बुद्धरूप घेत तो ध्यानस्थ झाला!
'वाघोबा झोपणार कधी' आणि 'बुद्ध उठणार कधी', या दोन प्रश्नांभोवती आमचं घर फिरतंय. आणि आपण करत असलेल्या गोंधळाबद्दल सर्वस्वी अनभिज्ञ असणारं आमचं बाळ, कणामासांनी वाढतंय!
अभिजित टोणगांवकर/ जुलै २०२६
0 Comments:
Post a Comment
<< Home